वजन कमी कसे करायचे? या टिप्स तुमचे वजन खात्रीशीर कमी करतात – भाग २

मागील भागात आपण प्रथिने, फळे आणि पालेभाज्या तसेच व्यायाम प्रकारातील वजन उचलणे, योगा, चालणे पळणे आणि जेवणाच्या वेळा याची माहिती घेतली. ​हा भाग तुम्ही पाहिला नसेल तर आजच्या दुसऱ्या भागाकडे वळण्या अगोदर “भाग पहिला”  या लिंक वरून तो पाहून घ्या. म्हणजे येणारी पुढील भागांची माहिती सहज समजेल आणि चुकून काही सुटणार नाही. वजन कमी करण्याच्या प्रवासात संपूर्ण माहिती असणे खूप गरजेचे आहे, त्यामुळे काहीही मिस करू नका.

जेवणात काय असावे आणि प्रमाण किती असावे?

रोजच्या आहारात काय असावे जितके महत्वाचे आहे, तितकेच ते कधी घेतो यालाही खूप महत्व आहे. स्थूल माणसांमध्ये जंक फूड खाण्याचे प्रमाण अधिक आहे. तळलेले तुपकट पदार्थ चवीला चांगले वाटत असले तरीही शरीरातील चरबी वाढविण्याचे काम करतात. तुम्ही जे काही खाणार आहेत त्या सर्वांचे पचन होऊन साखररुपी मेद वाढविण्याची प्रक्रिया होत असते. पहिल्या भागात सांगितल्या प्रमाणे नियमित व्यायाम प्रकारांचा उपयोग करणे अति महत्वाचे ठरते. रोजचा आहार जास्तीत ताज्या भाज्या, फळे आणि प्रथिनयुक्त अन्नाचा असायलाच हवा. चपाती, खासकरून मैदा रोटी यातील कार्बोहायड्रेट सेवन कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा.

किती आणि कधी खावे यालाही नियम आहेत. पोट भरून खाण्यापेक्षा नेहमी जेवता त्यापेक्षा १ चतकोर किंवा अर्धी गव्हाची चपाती, तांदूळ, बाजरी किंवा ज्वारीची भाकरी कमी खावी. विविध खाद्य पदार्थांमुळे आपण किती खातोय हे समजणे अवघड वाटत असेल तर जेवणाच्या अगोदर २ ग्लास पाणी प्यावे. जेणेकरून पोट भरल्याची जाणीव लवकर होईल आणि परिणामी गरजेपुरते अन्न शरीराला मिळेल. नैसर्गिक रित्या लागणारी भूक आणि त्यानंतर घेतलेल्या अन्नाला जास्त प्राधान्य द्यावे. कामाच्या व्यापानुसार, धावपळीनुसार अन्न घेण्याच्या वेळा वेगवेगळ्या असू शकतात. अगदी कामाची जेवणाची सुट्टीची वेळ सर्वांकडे एकसारखी नसते. त्यामुळे शक्यतो २ वेळा पोटभर जेवण कराल याकडे लक्ष द्यावे. बरेचशे प्रोफेशनल्स कामाच्या व्यापामुळे दुपारचे जेवण संध्याकाळी करतात, असे अवेळी जेवणे शक्यतो टाळावे. त्यामुळे घरी आल्यावर रात्रीचे जेवण उशिरा १० नंतर केले जाते हे शरीरासाठी खूप धोकादायक आहे. असे केल्याने तुम्ही स्वतःहून व्याधींना आमंत्रण देत आहात हे लक्षात घ्या.
दोन वेळा पोटभर जेवून अधिकची भूक लागत असल्यास हेच वजन वाढीचे प्रमुख कारण आहे हे समजून घ्या. अशा वेळेस एखादे ताजे फळ किंवा घरी बनविलेले ताजे ताक प्यावे. रोजच्या जेवणाच्या ताटाचे काही ठराविक प्रमाण ठरवून घ्यावे, त्यात अधिकाधिक प्रथिने घेण्याचा कल असावा. रोज एकतरी फळ पोटात जाईल याची तजवीज करा. फळ कोणतेही असले तरी चालते. ज्यांना पर्याय आहे त्यांनी शक्य असल्यास गोड गर असलेले फळ टाळले तर अधिक चांगले. आहाराप्रमाणे रोजचा व्यायाम प्रकारची वेळ वाढवत जावी. घाम येणे खूप महत्वाचे आहे, अन्यथा तुम्ही शरीराच्या गरजे पेक्षा कमी हालचाली करीत आहात हे समजून घ्या. परिणामी कमी केलेला आहार कोणत्याच प्रकारे फायदेशीर ठरणार नाही. नियमित व्यायामामुळे शरीरात कमालीचे बदल घडत जातात. रोजच्या खर्च केल्या जाणाऱ्या कॅलरी वाढत जाऊन घेतलेले पुरेसे पोषक अन्न वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते. वजन घटविणे चुटकी सरशी होणार नाही हे जाणून घ्या.

आज तुमचे असलेले वजन खूप वर्षांच्या मेद साठवणुकीच्या हळुवार पद्धतीने वाढले आहे. त्याला पूर्णपणे जाण्यासाठी थोडा कालावधी देणे जरुरी आहे. बरेच जण लेख वाचून लगेच बदल घडत नाही म्हणून काही आठवड्यातच सर्व नियम मोडीत काढतात. असे मुळीच करू नका. वजन हळूहळू कमी होते. नियमित व्यायाम आणि सकस आहारामुळे एक वेळ अशी येते कि तुमचे वजन झपाट्याने कमी होण्यास सुरु झालेले असते पण तुम्ही नेमक्या त्याच वेळेस सोडून देण्याच्या मनस्थितीत आलेले असता. त्यामुळे खूप धीर धरून व्यायाम, चालणे, पळणे अगदी योगा सुरु ठेवा.

टीप: लक्षात असुद्या, अन्न कमी खायचे असले तरी रोजच्या कामांसाठी शरीराच्या गरजे इतके पुरेसे असावे. अगदी कमी खाऊन चक्कर येण्या इतके कमी खाऊ नका. नाहीतर वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे तुम्ही सोडून द्याल किंवा अधिक अन्न खात रहाल.

water intake

वजन कमी करण्यासाठी पाण्याचे महत्व

शहरी भागात राहणारे खूपच कमी पाणी पितात हे प्रकर्षाने जाणवते. खासकरून पुरुष वर्ग पाणी पिणे अनावधानाने विसरून जातो. कामावर जाताना पाण्याची बाटली सोबत नेताना सहसा खूप कमी पुरुष मंडळी दिसतील. पाणी शरीरासाठी खूप गरजेचे असते हे सर्वजण जाणतात पण नकळत कमी पिणे हे सर्रास दिसते. मानवी शरीराला दिवसाला कमीतकमी ३ ते ४ लिटर पाणी आवश्यक आहे, हे विचारात घेतले तर प्रत्येकाने आपण किती पाणी पितो हे प्रामाणिकपणे विचार करण्यासारखे आहे. बिलकुल पाणी न पिणारे देखील लोक आहेत, आणि तेच मुळात अनेक विकारांना आमंत्रित करीत असतात. वजन वाढणे हे देखील त्यातीलच एक कारण.

वजन कमी करण्याच्या दृष्टीने खासकरून किमान ४ ते ६ लिटर पाणी पिणे जरुरी आहे. जेवढा आहार त्याच प्रमाणात पाण्याचे प्रमाण असणे जरुरी आहे. वजन वाढविणाऱ्यांनी जेवणानंतर तर घटविण्यासाठी जेवणाच्या अगोदर पाणी पिले पाहिजे. जेवण करताना किंवा जेवण झाल्यावर लगेच पाणी पिण्याचे टाळावे. ग्रहण केलेले अन्न पचण्याची क्रिया सुरु झालेली असताना पाणी पिल्याने पचन गती कमी होऊन परिणामी अजीर्ण, अपचन समस्या उद्भवतात. जेवणानंतर किमान १ ते २ तासानंतर पाणी पिणे सर्वात उत्तम. बऱ्याच वेळा उभे राहून पाणी पिले जाते जे कालांतराने गुढघे आणि सांधे दुखीला आमंत्रित करते. त्यामुळे शक्य त्यावेळी आरामात बसून पाणी पिण्याचा आग्रह धरा. घाई गडबडीत घटाघटा पाणी पिणे तर सर्वात वाईट, अशाने पचन संस्थेला याचा अधिकचा ताण येतो.

टीप: लेखाच्या शेवटच्या भागात डायट प्लान दिला जाणार आहे, त्यामुळे प्रत्येक भाग काळजी पूर्वक लक्षात घ्या. कोणी कोणता डायट वापरायचा आहे हे त्यावरच ठरणार आहे.

क्रमशः ..

Exit mobile version