प्रचलित शेती पद्धती प्रमाणे कोणत्याही पिकाच्या पेरणीपूर्वी मशागत झालीच पाहिजे अशी धारणा आहे. बैलजोडीची वर्षभर जोपासना करून भर उन्हाळ्यात पूर्व मशागतीच्या कष्टदायक कामात शेतकरी दरवर्षी व्यस्त असतो. नांगरणे, दिंड किंवा कुळवाच्या पाळ्या मारून माती बारीक करणे, ढेकळे फोडणे, सपाट करणे. वखरणी, कोळपणी अशा प्रकारची मशागतीची कामे नित्याचीच बाब बनली आहे. पूर्वमशागतीची अति कष्टाची कामे ट्रॅक्टरने तर कमी कष्टाची कामे बैलांकडून करून घेतली जातात. पिकाच्या लागवड खर्चामध्ये मशागतीचा खर्च निम्म्याहून अधिक असून दिवसेंदिवस मशागतीच्या खर्चामध्ये वाढ होत आहे, परिणामी लागवड खर्च देखील वाढत आहे.
दरवर्षीच्या मशागतीमुळे जमिनीमध्ये दीड फुटाखाली कडकपणा येऊन जमिनीची रचना बिघडली आहे. वारंवार जमीनीची मशागत केल्याने मातीची उलथापालथ होऊन खालच्या थरातील माती वर येते व या मातीवर सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे प्रतिकूल परिणाम होतो. तापलेल्या मातीतील सेंद्रिय कर्ब हवेत उडून जाण्याची प्रक्रिया सुरू होते. सेंद्रिय पदार्थ कमी झाल्याने मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीव आणि गांडूळासारखे उपयुक्त जीवांची उपासमार होऊन त्यांचे प्रमाण घटत जाते.
या सर्व समस्यांचे समाधान होऊन शेतकर्यास लागवड खर्चात बचत करून जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी शून्य मशागत तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे.
शून्य मशागत तंत्र – SRT
विना नांगरणी जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी विकसित केलेले तंत्र म्हणजे “शून्य मशागत तंत्र” होय. एसआररटी तंत्रामध्ये आणि विना नांगरणीच्या शेतीमध्ये सुरवातीलाच गादी वाफ्यावर पिकांची लागवड केली जाते. गादीवाफे न मोडता आणि कोणतीही नांगरणी, कुळवणी, वखरणी न करता पिकांची टोकण पद्धतीने लागवड केली जाते. तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निंदणी, भांगलणी किंवा कोळपणी न करता तणनाशकांचा वापर केला जातो. पिकांची काढणी करताना पिके खोडापासून कापून घेतली जातात आणि खोडाचे अवशेष (सड), धसकटे व मुळे जमिनीतच ठेवली जातात.
मागील काही वर्षातील हवामानातील बदल व पावसाची अनिश्चितता, सरासरीपेक्षा कमी पाऊस, गारपीट या सर्व कारणांमुळे पाणी टंचाई तसेच पिकांच्या उत्पादनात घट जाणवत आहे. तसेच वाढत्या तापमानामुळे कोरडवाहू पिकांच्या उत्पादकतेवरील परिणाम तसेच जमिनीतील कर्बामध्ये व ओलाव्यामध्ये घट येत आहे. बदलत्या हवामानात जमिनीच्याConservation Agriculture, No Till शेतीची आधुनिक पद्धत आहे. जमिनीतील सेंद्रिय कार्बन वाढविण्यासाठी, जमिनीची उत्पादकता लक्षणीयरीत्या वाढविण्यात उपयोगी आहे. सगुणा रीजनरेटिव्ह टेक्निक (SRT) लागवड पद्धतीत तयार केलेले उंच बेड मुळांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा सुलभ करून आर्द्रता राखतात. तृणधान्ये, भाजीपाला, कडधान्ये, तेलबिया, बाजरी, कापूस, मका इत्यादी वेगवेगळ्या पिकांसाठी एसआरटीचा वापर केला जात आहे.
सुपिकतेचा देखील र्हास होत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकऱयांनी हवामान अनुकूल असणारी “संवर्धित शेती” पद्धती अवलंबल्यास जमिनीच्या संवर्धनाबरोबरच उत्पादन खर्चामध्ये लक्षणीय घट होत असल्याचे दिसून आले आहे. पारंपरिक शेतीच्या तुलनेत “शून्य मशागत” या तंत्राचा वापर अत्यंत प्रभावी दिसून आलेला आहे.
शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर करून कृषिभूषण चंद्रशेखर हरिभाऊ भडसावळे (७६१०१११८९६) यांनी सगुणा बाग, कर्जत तालुका, जिल्हा रायगड येथे भात पिकासाठी “सगुणा रिजनेरटीव्ह तंत्र (SRT)” विकसित केले असून सदर तंत्राची संयुक्त राष्ट्रसंघाच्या Food and Agriculture Organization of United Nations (FAO) अन्न व कृषि संस्थेने नोंद घेतली आहे.
राज्याच्या कृषि विभागामार्फत सदर तंत्राचा व्यापक प्रसार करण्यात येत आहे. भाताबरोबरच इतरही पिकांमध्ये फायदेशीर असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असलेल्या शेती शाळेमध्ये सदर तंत्राचा प्रायोगिक तत्वावर अवलंब करण्यात येत असून खरीप हंगामात कापूस, रब्बी हंगामात मका आणि त्यानंतर झेंडू पिकाचे यशस्वीपणे उत्पादन घेण्यात आले आहे. पहिल्या वर्षी गादी वाफ्यावर पिकांची लागवड नंतर कोणतीही मशागत नाही आणि त्यानंतर दुसऱ्या पिकाची लागवड आणि दुसऱ्या पिकाच्या कापणीनंतर पुन्हा मशागत न करता तिसऱया पिकाची लागवड अजी शून्य मशागतीची पद्धती असून मागील दोन वर्षामध्ये प्रकल्प गावांमध्ये शेतीझाळेमध्ये याबद्दलची निरीक्षण घेण्यात आलेले आहेत.
मुख्य उद्देश आणि शेतकरी बांधवांचा फायदा कसा होतो
- मातीच्या सुपीक थरांमध्ये उलथापालथ होत नाही.
- पावसाचे पाणी भूगर्भात झिरपण्याचे प्रमाण वाढते.
- सेंद्रिय पदार्थांची मातीमध्ये दीर्घकालीन साठवण होण्यास मदत.
- मातीचे तापमान नियंत्रित राहते, मातीच्या कणांची रचना सुधारते.
- सेंद्रिय कर्ब आणि ओलावा टिकून राहिल्याने मातीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ.
- पूर्वीच्या पिकाची मुळे जमिनीत राहिल्यामुळे सेंद्रिय कर्ब जलद वाढतो.
- रासायनिक खताची बचत.
- जमिनीमध्ये गांडूळांचा विपुल प्रमाणात संचार सुरू होतो.
- जमिनीत जैविक विविधतेत वाढ, मातीचे आरोग्य सक्षम होते.
- जमीन भेगाळण्याचे प्रमाण कमी होते तसेच जमिनीची धूप कमी होते.
- एकरी रोपांची संख्या नियंत्रित केल्यामुळे बियाण्याची बचत होते.
- पिकावर रोग किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
- मशागतीसाठी लागणारे मनुष्यबळात बचत होते.
- मशागत खर्च शून्यावर येऊन उत्पादन खर्चामध्ये मोठी बचत होते.
- पिकांची प्रत सुधारते, उत्पादकतेमध्ये वाढ होते.
- दोन पिकांमधील मशागतीचा वेळ वाचून पिकाची लवकर लागवड करता येते.
सर्व कृषी हवामान विभागांमध्ये बहुतांशी सर्व पिकांसाठी शून्य मशागत तंत्र फायदेशीर ठरले आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवलंबले जावे म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रकल्पांतर्गत प्रत्येक गावातील शेतकऱ्यांपर्यंत शून्य मशागत (Zero Tillage) हे तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी शोतीशाळा, प्रशिक्षण, अभ्यास दौरे, कार्यशाळा इ. माध्यमातून प्रसार करण्यात येत आहे. सदर तंत्राची कर्ब ग्रहण (Carbon Sequestration) वाढविण्यासाठी उपयुक्तता लक्षात घेता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे व त्याचा अवलंब वाढवणे क्रमप्राप्त आहे.
शून्य मशागत तंत्र विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील तज्ञांशी संपर्क करा
२. परशुराम आगिवले 9172332629
४. नवीन बोऱ्हाडे 9404963973
५. सुरेश बेडवाल 9422622610
- शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनविणे.
- क्षेत्रामध्ये शून्य मशागत (एसआरटी) तंत्रज्ञानाचा व्यापक प्रसार करणे.
- जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवून जमिनीची सुपिकता वाढविणे.
- पावसातील खंड तसेच अतिपाऊस या दोन्ही परिस्थितीत अनुक्रमे पाण्याचा ताण सहन करण्यास आणि अति पाण्याचा निचरा करण्यास शेतकऱयांना सक्षम करणे.
- शून्य मशागत (एसआररटी) तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे.
- पिकांच्या उत्पादकतेत वाढ करण्यास मदत करणे.